Sharad Pawar Resigns: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पक्षाच्या भवितव्यासाठी आणि नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पद सोडण्याबाबत येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचही म्हटलं आहे.
या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी समर्थकांकडून होत आहे. वाय.बी.चव्हाण केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले की, अंतिम निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. पवारांच्या समर्थकांनी आज वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर तळ ठोकून त्यांचा निर्णय बदलण्याची मागणी केली. (हेही वाचा - Uddhav Thackeray On Sharad Pawar: शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया!)
यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले की, 'मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मी माझ्या योजनांबद्दल तुम्हा सर्वांशी चर्चा करून तुम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, पण मला हेही माहीत आहे की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही मला निर्णय घेऊ दिला नसता.'
दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्राबाहेरील पक्षाचे काही सहकारी या विषयावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या समर्थकांनी या वेळी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी कोणाची तरी नियुक्ती करून पवार यांनीचं पक्षाध्यक्षपदाच्या भूमिकेत राहावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करताना शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी शरद पवार म्हणाले, 'माझ्या मित्रांनो! मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत आहे, पण सामाजिक जीवनातून संन्यास घेत नाही. सततचा प्रवास हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मी सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहीन. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली किंवा भारताच्या कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. लोकांचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. मला जनतेपासून वेगळेपण मिळत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत होतो आणि राहीन. त्यामुळे आपण भेटत राहू.'
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, 'पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाली. अध्यक्षपदाची जबाबदारी मी अनेक वर्षे सांभाळली. ही जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. आता मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे.