N D Mahanor and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

N D Mahanor and Sharad Pawar: प्रसिद्ध गितकार, रानकवी ना धो महोनोर यांचे निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यासोबत राजकीय वर्तुळातूनही दु:ख व्यक्त केले जात आहे. खास करुन शरद पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule), मराठी साहित्य परिषदेने दु:ख व्यक्त केले आहे. नामदेव धोंडो महानोर नामक सामान्य तरुणाची काव्यप्रतिभा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ओळखली. त्यांनी महानोरांच्यातील साहित्यिकाचा राज्याच्या विधिमंडळालाही उपयोग करुन घेण्याचे ठरवले. त्यातूनच शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून ते राज्यविधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार बनले.

ना धो महानोर यांच्या निधनाबद्दल शोख व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी ट्विटरच्या माध्यातून भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार यांनी म्हटले आहे की, ''माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.''

ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली. दादांच्या (महानोर) जाण्यामुळे प्रचंड धक्का बसला. पाठिमागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. महानोर आणि पवार कुटुंबीयांचे पाठिमागील अनेक दशकांचे नाते आहे. त्यांच्या अनेक आठवणी मनात फेर घालून बसतात. खास करुन ते बारामतीला घरी येत. आल्यावर त्यांच्यात आणि पवार साहेबांच्यात राजकीय चर्चा होत. घरात ते मांडी घालून बसायचे. एखादा विषय बोलून झाला की, ते त्यावर थेट कविताच करायचे. आज या सर्वाला आम्ही मुकलो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.