शरद पवार यांच्याकडून पारनेर, लॉकडाऊन,  कोरोना व्हायरस यांसह विविध विषयांवर भाष्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. ते टीका करतच राहणार. मात्र मुख्यमंत्र्यांचे काम दिसत आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) काळात कामाचा प्राधान्यक्रम बदलला आहे. राज्याच्या हितासाठी 14 ते 15 तास बैठका होत आहेत. अशा वेळी टीका करने योग्य नव्हे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांची पाठराखण केली. तसेच, राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या अथवा पारनेरची (नगरसेवक फोडाफोडी) राजकीय घटना हे फार मोठे मुद्दे नाहीत, अशा शब्दात विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी पुणे येथे व्यापारी महासंघासोबत बैठक घेतली. त्यानंतर विविध मुद्दे जाणून घेतल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकासआघाडी आणि घटकपक्षातील धुसफूस यांबाबतही पवार यांनी भाष्य केले.

या वेळी बलताना शरद पवार म्हणाले की, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या सर्वाचा नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. या सर्वांची जबरदस्त किंमत जनतेला मोजावी लागत आहे. या संकटाचा फटका महाराष्ट्र, दिल्ली आणि देशातील इतर प्रगत राज्यांना अधिक बसेल. या संकटामुळे राज्यातील विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम जाला आहे. यात आयटी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, हॉटेल क्षेत्र अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. आज व्यापारी महासंघासोबत एक बैठक झाली. या बैठकीस टिंबर, ऑटो, मशिनरी आणि इतर व्यापारी अशा 28 संघटना उपस्थिती होत्या. सलग तीन महिने उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी, उद्योजकांना प्रचंड मोठा फटका बसल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.

पुण्यामध्ये व्यापार, उद्योगाचे केंद्रीकरण झाले आहे. त्याचे विकेंद्र करण करण्याचा विचार आहे. परंतू, त्यासाठी सरकारने पुणे येथे मोठी जमीन उपलब्ध करुन द्यायला हवी. तसे झाले तर इथला व्यापार शिफ्ट होऊ शकतो. त्यासाठी मिळणारी जागा रिंगरोड नजिकअसावी. तसेच मेट्रो, रस्ते, कामगारांसाठी राहण्यासाठी जागा अशा विविध गोष्टी असाव्यात. त्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, शरद पवार यांची मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल- संजय राऊत)

महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये नाराजी असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, असे काहीही नाही. तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आहेत. राज्यातील सर्व समस्यांवर आम्ही चर्चा करतो. संजय राऊत हे माझी मुलाखत घेणार होते. त्यामुळे सर्वात जवळचे ठिकाण म्हणून मी मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर जाण्यात कमीपणा वाटत नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांना चिंता वाटते, मला त्यावर भाष्य करायचे नाही, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, विरोधकांचे टीका करण्याचे कामच आहे. त्यामुळे ते टीका करत राहतील. परंतू, मुख्यमंत्र्यांचे काम दिसत आहे. राज्याच्या हितासाठी 14 ते 15 तास बैठका सुरु आहेत. टीका करत बसू नये. राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा फार मोठा नाही. तसेच पारनेरचाही मुद्दा (नगरसेवक फोडाफोडी) तितका मोठा नाही. त्यामुळे त्याचा राज्यावर फार परिणाम होणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.

पुढे ते म्हणाले, 'चीनविरुद्ध झालेल्या 1962 च्या युद्धात आपल्याला पराभव स्वीकारावा लागला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु आणि तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एलएसीवर जाऊन भारतीय सैन्याचे मनौधैर्य वाढवले होते. आताही विद्यमान पंतप्रधानांनी तेच केले आहे. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैनिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.'