शरद पवार यांनी संरक्षणमंत्री असताना चुका दुरुस्त करायला हव्या होत्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रत्युत्तर
Nitin Raut (Photo Credit: ANI)

पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षावरून देशासह महाराष्ट्राचे राजकारणही तापलेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारत-चीन संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. दरम्यान, राष्ट्रावादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली होती. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले होते. राहुल गांधीवर केलेल्या टीकेला उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 1962 मध्ये चीनने आमचा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कॉंग्रेसच्या नियमांतर्गत शरद पवार जेव्हा संरक्षणमंत्री तेव्हा त्यांनी आपल्या चुका सुधारल्या पाहिजे होत्या. राहुल गांधींच्या टीकेवर भाष्य करण्याऐवजी त्यांनी मोदींना प्रसार माध्यमांना सामोरे जाऊन वस्तुस्थिती देशासमोर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे नितीन राऊत म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की 1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता. यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते, इंदिराजींनी 1971 चे युद्ध जिंकले होते. हे पण पवारांना आठवले असते तर बरे झाले असते. पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरे झाले असते. शरद पवार हे काँग्रेसमध्येच तयार झालेले नेतृत्व आहे, असेही नितीन राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज्य शासनाचा मोठा निर्णय; ‘या’ विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा, 4 जुलै पासून अंमलबजावणी

एएनआयचे ट्विट-

काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. चीनने घुसखोरी केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करणे योग्य नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र, 1962 च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला 45 हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही असे पवार यांनी म्हटले होते.