Sharad Pawar On Sanjay Raut & Ajit Pawar: संजय राऊत यांचे भाकीत आणि अजित पवार यांचे पोस्टर यावर शरद पवार यांचे भाष्य; घ्या जाणून
Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागणारे पोस्टर तसेच शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विद्यमान राज्य सरकारबद्दल केलेले विधान यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी केलेले विधान अथवा भाष्य हे त्यांच्या स्वतंत्र स्त्रोतांवर आधारीत आहे. त्यांच्याकडे माहितीचा तसा स्त्रोत असेल. मला त्याबाबत माहिती नाही. अजित पवार यांच्या पोस्टरबद्दल स्वत: अजित पवार यांनीच म्हटले आहे की, असे पोस्टर्स लावणे म्हणजे वेडेपणा आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राज्यातील विद्यमान सरकार हे गेल्यात जमा आहे. राज्य सरकारचे मृत्यूपत्र लिहीलेगेले आहे. हे सरकार काही दिवसांचेच आहे. संजय राऊत यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. त्यातच राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेले भाष्य या सर्वच गोष्टी एकमेकांना लागून आल्याने चर्चेला उधान आले. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत पण आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे, असे जाहीर विधान महसूलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. या सर्व चर्चा विधानानंततर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आपल्या गावी सुट्टीसाठी गेले आणि या चर्चांना अधिकच बळ मिळाले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या जोरादार चर्चा सुरु आहेत. (हेही वाचा, Maharashtra Politics: मुख्यमंत्री रजेवर जाण्याच्या चर्चांना शिंदेंनी दिला पुर्णविराम, म्हणाले - मी रजेवर नसून डबल ड्युटीवर)

ट्विट

दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. मनात आणले तर राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्री पद मिळवू शकते, असे विधान अजित पवार यांनी केल्यामुळे राज्यात नव्या आघाडीची ही चाचपणी तर नाही ना? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच अजित पवार यांच्या विधानांचा धागा पकडत पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे अजित पवार यांचा उल्लेख करुन बॅनर झळकले. या सर्वांवर आल्या खास शैलित अगदी मोजक्या शब्दात शरद पवार यांनी भाष्य केले.