Sex With Mentally Challenged Woman: 'मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलेसोबत लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार'; मुंबई न्यायालयाने दोषीला सुनावली 10 वर्षांची शिक्षा
Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sex With Mentally Challenged Woman: एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुंबईच्या सत्र न्यायालयाने (Mumbai Court) आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, मानसिकदृष्ट्या आजारी (Mentally Challenged) महिलेने शारीरिक संबंधास संमती दिली असली तरी, असे लैंगिक संबंध हा बलात्कारच आहे. न्यायालयाने नमूद केले, जर एखादी महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल आणि कृत्याचे परिणाम व स्वरूप समजून घेण्यास असमर्थ असेल, तर तिने संमती दिली तरीही तिच्याशी शारीरिक संबंध बलात्काराच्या श्रेणीत येतात.

या प्रकरणात एका 24 वर्षीय तरुणाने 23 वर्षीय महिलेशी लैंगिक संबंध ठेवले होते व त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. या तरुणाला दोषी ठरवताना न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

रिपोर्टनुसार, मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा गर्भपात केला गेला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाने सांगितले की, महिलेचे मानसिक वय 9 वर्षांच्या मुलीसारखे होते. आरोपी आणि पीडिता हे गर्भपात केलेल्या गर्भाचे जैविक पालक असल्याचे निष्पन्न झाले. ज्यावेळी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले गेले त्यावेळी ती मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हती. या सर्व बाबी विचारात घेऊन न्यायाधीश डीजी ढोबळे म्हणाले की, आरोपीने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. मानसिक विकार किंवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती विशेष काळजी, प्रेम आणि आपुलकीची पात्र आहे. त्यांचे शोषण होऊ नये.

सुनावणीदरम्यान आपला बचाव करताना आरोपीने सांगितले की, त्याने पीडितेसोबत तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र, न्यायमूर्ती म्हणाले की, या प्रकरणात पीडितेची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक नसल्याचे फिर्यादी पक्षाने सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत, मानसिकदृष्ट्या विकलांग मुलगी अशा कोणत्याही कृत्यास सहमती देऊ शकत नाही, ज्याचे परिणाम तिच्या लक्षात येत नाहीत. न्यायालयाने आरोपीचा बचाव फेटाळून लावला. त्यांनी पुढे म्हटले की, मुलीचे मानसिक अपंगत्व लक्षात घेता तिची  संमती अप्रासंगिक आहे आणि कायद्यानुसार आरोपीने बलात्कार केला असे म्हणता येईल. (हेही वाचा: Gang-Rape And Murder Of Minor Girl: सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक)

महिलेच्या आईने 9 जानेवारी 2019 रोजी कुरार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले होते. त्यानंतर मुलीकडे विचारणा केली असता, तिने सांगितले की, चार महिन्यांपूर्वी ती किराणा दुकानात गेली होती त्यावेळी जवळच्या सलूनमध्ये काम करणाऱ्या आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अंधाऱ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.