महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करून सत्यजीत तांबे हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्याखालोखाल आ. अमित झनक आणि कुणाल राउत दुसऱ्या क्रमाकांची सर्वात जास्त मते मिळवून उपाध्यक्ष झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी सत्यजीत तांबे यांच्यासोबत अमित झनक, कृणाल राऊत या निवडणूक रिंगणात होते.सत्यजीत तांबे यांच्या निवडीमुळे युवक कॉंग्रेसमध्ये चैतन्याची लाट पसरली असून, अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी युवकांनी मोठा जल्लोष केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातर्फे देशातील युवकांनी पक्षसंघटनेत अधिकाधिक सक्रीय व्हावे यासाठी प्रत्येक राज्यात युवक काँग्रेसची निवडणूक घेतली होती, या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातून मोठया प्रमाणात युवकांची नोंदणी झाली. आता सत्यजीत तांबे यांच्या निवडीमुळे ६० युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे. येत्या २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी या निवडीने कॉंग्रेस पक्षाला फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे तर आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे सुपुत्र आहेत. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. मागील २० वर्षांपासून काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रीय असलेले सत्यजीत यावेळी अध्यक्षपदी ३७१९० इतक्या मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवडून आले आहेत. राज्यभर युवकांना सोबत घेवून काम करणारे सत्यजीत तांबे हे राज्यातील अभ्यासू, धाडसी तसंच विविध भाषांवर प्रभुत्व असणारा युवा नेता म्हणून सर्वत्र ओळखले जातात.