CRIME (Photo Credit- X)

साताऱ्यातील (Satara) माण तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाने क्षुल्लक कारणाने आपल्या आईची हत्या केली. आईने जेवण देण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत स्टीलच्या भांड्याने या तरुणाने तिची हत्या केली. ही घटना 10 जानेवारी रोजी रात्री उशिरा दहिवडी येथे घडली. दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आनंदराव जाधव हा रात्री दहाच्या सुमारास घरी परतला असता मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने त्याची आई संगीता आनंदराव जाधव यांना जेवण देण्यास सांगितले.

आईने जेवण देण्यास नकार दिला व स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी रागाच्या भरात व नशेत विशालने त्याच्या 48 वर्षीय आईवर स्टीलच्या भांड्याने हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने संगीता बेशुद्ध पडल्या.

यावेळी त्यांच्या ओरडण्याने शेजारी जमा झाले व त्यांनी तिला दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात हलवले मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्ह्याच्या तासाभरात दहिवडी पोलिसांनी विशालला अटक केली. या निर्घृण हल्ल्यामागे त्याचे दारूचे व्यसन असल्याचे मानले जात असून, रात्री उशिरा  त्याला दारू कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. (हेही वाचा: Nanded Shocker: नांदेडमध्ये स्मार्टफोन न मिळाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या; शेतकरी बापानं देखील त्याच ठिकाणी संपवले जीवन)

या दुःखद घटनेने माण आणि खटाव तालुक्यात दारूबंदीच्या वाढत्या प्रश्नाबाबत चर्चा होत आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कारवाईची मागणी करत परिसरातील अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई न केल्यास अवैध दारू धंद्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.