बीड: सपना चौधरीच्या अदा आणि नृत्याची खबर कानोकनी बीडकरांनाही लागली. त्यामुळं सपनाचे नृत्य बघण्यासाठी ते भलतेच उत्सुक झाले. पण, या उत्सुकतेचा शेवट काय? किंवा सपनाचे नृत्य आपणांस कसे बरे पाहता येईल? या प्रश्नात बरेच बिडकर हरवले होते. पण, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली ती, परळीच्या बाप्पांनी. नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाकडून सपना चौधरीच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले. अर्थात, या आयोजनाची खबर बीडकरांना कळली नसती तरच नवल. त्यामुळं स्वप्नातल्या सपनाला वास्तवात बघायची संधी बहुतांश बीडकरांनी सोडली नाही. सपनाच्या कार्यक्रमाला तोबा-तोबा गर्दी झाली.
महत्त्वाचे म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम सुरु झाला. सपनाचे नृत्य पहायला मिळणार म्हणून उपस्थित प्रेक्षक चांगलेच उत्सुक झाले. पण, काही अतिउत्साही प्रेक्षकांमुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला. शेवटी गोंधळ शांत करण्यासाठी धनंजय मुंडे यांनाच लक्ष घलावं लागलं. धनंजय मुंडे थेट प्रेक्षकात गेले. त्यांनी प्रेक्षकांना (अतिउत्साही) शांत राहण्याचं अवाहन केलं. त्यानंतर काही वेळातच कार्यक्रम पुढे सुरु झाला.
बिग बॉसच्या ११व्या पर्वातील एक स्पर्धक असलेल्या सपनाचे नृत्य बीडकरांनी पाहिले. पण, कदाचित सपनालाही माहिती नसावे परळी आणि बीडमध्ये आपले किती चाहते आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सपनाला तिच्या चाहत्यांना पहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान, सपनाचे नृत्य पहायला काही उतिउत्साही चाहते इतके उताविळ झाले होते की, त्यांनी मंडपासाठी उभारलेल्या खांबावर चढून सपनाच्या नृत्याचा आनंद घेतला. सपनानेही चाहत्यांचे प्रेम पाहून मग, नृत्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे सपनाच्या नृत्याचा सर्व प्रकारचा अविष्कार चाहत्यांना अनुभवता आला.