Sanjay Raut (Pic Credit - ANI)

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या (Medha Somaiya) यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ते म्हणाले होते.

मेधा सोमय्या यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देताना हे आरोप निराधार आणि निंदनीय असल्याचे म्हटले होते. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी संजय राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली होती आणि तसे न केल्यास संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. अजूनतरी संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मेधा सोमय्या यांची माफी मागितलेली नाही, त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

मेधा सोमय्या यांनी सांगितले की, 15 आणि 16 एप्रिलच्या बातम्या पाहून मला धक्का बसला ज्यामध्ये राऊत यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये 100 कोटी रुपयांचा आरोप केला होता. या घोटाळ्यात मी देखील सहभागी असल्याचे म्हटले होते. मेघा सोमय्या यांनी, प्रसारमाध्यमांसमोर दिलेली वक्तव्ये बदनामीकारक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याआधी संजय राऊत यांनी मेधा यांचे पती आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस (INS) विक्रांत प्रकरणात घोटाळ्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, 'भाजप नेत्याने आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जनतेकडून देणग्या मागितल्या होत्या. या देणगीतून त्यांनी 57 कोटी रुपये जमा केले होते. मात्र ज्या कामासाठी देणगी जमा झाली ते काम पूर्ण झाले नाही आणि किरीट सौम्या यांनी ही रक्कम राज्यपालांकडे जमा करण्याऐवजी पक्ष निधीत जमा करून घेतली. अशाप्रकारे किरीट सोमय्या यांनी खोटे बोलून जनतेकडून पैसे घेतले.