शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha Elections) पश्चात राज्यात सरकार स्थापनेवेळी सुरु केलेली ट्विटर वरील शेरोशायरीची मालिका अद्याप सुरु आहे. आज, 14 डिसेंबर रोजी राऊत यांनी एक नवीन ट्विट करत पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. "सब के दिलों में धडकना जरूरी नहीं होता...... साहब...... कुछ लोगों की आंखों में ....खटकने का भी, एक अलग मजा होता है" असे म्हणत ट्विट केलेल्या संजय राऊतांचा नेमका निशाणा कोण आहे हे मात्र आता स्पष्ट झालेले नाही.
निवडणूक पूर्व काळात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मागील कित्येक वर्ष एकत्र आलेल्या महायुतीच्या म्हणजेच शिवसेना भाजप पक्षात आलेल्या अंतरानंतर आता सेनेने पूर्णतः भाजपविरुद्धा पवित्रा हाती घेतला आहे, त्यामुळे राऊत यांना नेमकं कोणाच्या डोळ्यात खुपण्याची मजा मांडायची आहे याबाबत अनेक कयास बांधले जात आहेत.
संजय राऊत ट्विट
सब के दिलों में
धडकना जरूरी
नहीं होता...... साहब......
कुछ लोगों की आंखों में ....
खटकने का भी ,,,,,,
एक अलग मजा होता है।
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 14, 2019
प्राप्त माहितीनुसार शिवसेना राज्यात सत्तेत आल्यापासून फडणवीस सरकारने सुरु केलेल्या अनेक प्रकल्पांवर स्थगिती आणण्याच्या मागे लागली आहे. केवळ राज्यातच नव्हे तर केंद्रात सुद्धा नागरिकत्व सुधारणा कायदा प्रस्ताव मांडला जात असताना या अंतर्गत वादाचा प्रत्यय आला होता. संजय राऊत यांनी भाजपाला टोला लागवतना आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नका कारण तुम्ही ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक आमचे बाळासाहेब ठाकरे होते असे म्हंटले होते. अशातच आता हे ट्विट त्यांच्या एकूणच भाजप विरोधाचे प्रदर्शन घडवणारे असू शकते.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सेनेचे शिवधनुष्य मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अखेरीस काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत हातमिळवणी करून या प्रयत्नांना अंतिम यश सुद्धा आले. मात्र या स्पर्धेत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या तसेच संपूर्ण एनडीएच्या साथीवर मात्र सेनेला पाणी सोडावे लागले होते, परिणामी एनडीएतून बाहेर पडत असताना सेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता.