शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्ली मार्गे महाराष्ट्रावर चाल करुन येत आहे. महाराष्ट्रातील जनता या वृत्तीला कधीच स्वीकारणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाच्या गावात औरंगजेब जन्माला आला. तिथूनच तो महाराष्ट्रावर चाल करुन आला तीच वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरुन राज्यावर चाल करत आहे. शिवसेनेच्याही विरोधात येते आहे, असे राऊत म्हणाले. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मोदी आले मोदी आले, असे म्हटले यावर मोदी नाही.. औरंगजेब आला असे म्हणा, अशी साद राऊत यांनी उपस्थितांना घातली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बुलढाणा येथील सभेतून ते बोलत होते.
औरंगेजबी वृत्ती या महाराष्ट्राने केव्हाही स्वीकारली नाही. त्यामुळे आताही ती स्वीकारली जाणार नाही. जो या राज्यावर चाल करुन येतो त्याची अवस्था काय होते हे औरंगजेबाला माहिती आहे. या वृत्तीला हा महाराष्ट्र, मुंबई ओरबडायची आहे. राज्य विकायचे आहे. म्हणून ते प्रयत्न करत आहेत. आपल्याला ते होऊ द्यायचे नाही. लक्षात ठेवा जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत हे कदापीही होऊ देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, Sanjay Raut On BJP: काँग्रेस नसती तर भाजपवाले ब्रिटीशांची गुलामी करत असते- संजय राऊत )
दरम्यान, याच सभेतून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तोफ डागली. जे आज भाजपमध्ये गेले आहे त्यांनी ईडीभाई, आयटीभाई यांच्या दबावापुढे शेपुट घातली आहे. हे भाजपवाले याच ईडी, आयटीच्या जीवावर मजा मारत आहेत. भाजपची चाकरी करणे म्हणजे आयुष्य नाही हे लक्षात घ्या. ही महाराष्टाची माती आहे. या मातीने जिजाऊ दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यामुळे हा महाराष्ट्र लढवय्यांचा आहे. लेच्यापेच्यांचा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी पुन्हा आलो तेही दोन पक्ष फोडून. फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांना संपवीण्यासाठी त्यांना कचरा जमा करावा लागतो, अशी टीका त्यांनी केली. (हेही वाचा, Modi Ka Parivar Vs Electoral Bonds: इलेक्टोरल बॉन्ड मोदी का परिवार? पंतप्रधानांनी 'X' वर शेअर केलेल्या व्हिडिओवर टीकेचा भडीमार)
आजकाल खतांच्या पिशवीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि आतमध्ये शेणखत. हा फोटोच आता आता आपल्याला बदलायचा आहे. कितीही हे खत टाकले तर त्यातून गद्दारीचेच अंकूरफुटतील. तुम्ही गद्दारांना किती दिवस खासदार करणार, असा सवाल विचारत उद्धव ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली.