Photo Credit- Facebook

Sangli Lok Sabha Election 2024: सांगलीच्या जागेमुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सांगली मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप ठरण्याआधी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने तिथे विशाल पाटील हे तिथे अपक्ष उभे राहिले आहे. तर भाजपकडून संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. (हेही वाचा:Baramati Lok Sabha Elecion 2024: बारामतीत नणंद विरूद्ध भावजय लढत; सुप्रिया सुळे यांचे पारडे जड, अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला )

विशाल पाटील कोण आहेत?

सांगलीत वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी विशाल पाटील राजकारणात उतरलेत. विशाल पाटील हे सांगलीचे ४ वेळा खासदार राहिलेले प्रकाशबापू पाटील यांचे छोटे चिरंजीव आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठं नाव आणि राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. विशाल पाटलांचे मोठे बंधू प्रतिक पाटील हे सुद्धा २ वेळा खासदार राहिले आहेत.

विशाल पाटलांनी २०१० साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत राजकारणात एन्ट्री केली. पण या निवडणूकीत माजी मंत्री मदन पाटील जे विशाल पाटलांचे चुलत बंधू आहेत. यांनी त्यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला.2015 मध्ये पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत मदन पाटलांचा पराभव करून २०१० चा बदला घेतला.

विशाल पाटलांनी २०१९ ला सुद्धा लोकसभा लढवली होती. पण ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर. त्यात त्यांचा पराभव झाला होता. यात त्यांना 3 लाख 40 हजार 871 मते मिळाली होती.