सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. जत (Jat) तालुक्यातील उमदी गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळा (Samata Ashram Shala) येथील मुलांना देण्यात आले होते. या जेवणानंतर मुलांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला. यानंतर मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. सध्या ही सर्व मुलं माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 10 मुलांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Beed Brawl Video: महिला बस कंडक्टर आणि महिला प्रवासी यांच्यात जोरदार राडा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
79 विद्यार्थी सध्या उपचार घेत आहेत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. उर्वरित 90 रुग्णांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये आणि जत मधील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत. सध्या या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसंच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या आणि दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमदीमधील समता आश्रम शाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.