सांगलीमध्ये (Sangli) कुटूंबियांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये एका कुटूंबियांने आपल्या मुलाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यामुळे झालेल्या कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. यात एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी, त्याची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मुलाने सावकारांकडून कर्ज घेतले आणि शेअर मार्केटमधून अपेक्षित पैसे न मिळाल्याने हे गवाणे कुटूंब आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे अखेर कर्जबाजारी झालेल्या या गवाणे कुटूंबाने आत्महत्येचे पाऊल (Family Suicide Case) उचलले. सेवानिवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे, पत्नी मालन अण्णासो गव्हाणे आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
मिरज तालुक्यातील बेळंकी गावात जिल्हा पोलीस दलातील निवृत्त कर्मचा-याने मुलगा आणि पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही गवाणे कुटूंबियाला दीड कोटी देणे होते. इतके पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न कुटूंबाला पडला होता. अखेर या कर्जाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मृतदेहा शेजारी सापडलेल्या चिट्ठीत देखील कर्जाच्या बाबी नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
हेदेखील वाचा- औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा केला प्रयत्न
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. अण्णासाहेब गवाणे हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. तर त्यांचा मुलगा महेश हा इंजिनीअर होता. शेअर मार्केटमध्ये त्याने पैसे गुंतवणूक केली होती. हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्याने काही सावकारांकडून कर्ज घेतले होते.
अंदाजे कोटीच्या आसपास ही रक्कम असल्याची चर्चा आहे. महेश गवाणे याने काही दिवसांपूर्वी त्याला होणारा त्रास आणि यामुळे आपण आत्महत्या करणारी फेसबुक पोस्ट देखील लिहिली होती. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.