महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: सांगली जिल्ह्यातील मतदारसंघ, खानापूर-आटपाडी , तासगांव-कवठे महांकाळ , इस्लामपूर यांसह इतर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
(Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह राजारामबापू पाटील, आर. आर पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील यांचे नेतृत्व लाभलेला सांगली जिल्हा अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. 2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याला बऱ्याच अंशी धक्का लागला. काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप, शिवसेनेत गेल्यामुळे या बालेकिल्ल्याला धक्का लागला. अनेक ठिकाणी बुरुज कोसळले, काही ठिकाणी किल्लेच जमीनदोस्त झाले. लोकसभा निवडणूक 2019 मध्येही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणूक 2019 बाबत प्रचंड उत्सुकता आहे. या निवडणूकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ (Islampur Assembly Constituency), खानापूर विधानसभा मतदारसंघ (Khanapur-Atpadi constituency), जत विधानसभा मतदारसंघ (Jat Assembly Constituency), तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly Constituency), पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ (Palus-Kadegaon Assembly Constituency), मिरज विधानसभा मतदारसंघ (Miraj Assembly Constituency), शिराळा विधानसभा मतदारसंघ (Shirala Assembly Constituency), सांगली विधानसभा मतदारसंघ (Sangli Assembly Constituency) कोणत्या पक्षाला आणि उमेदवारांना कौल देतात याबाबत उत्कटा वाढली आहे. या पार्श्वभूमिवर या जिल्ह्यातील मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अशी थेट ओळख. विरोधकांनी जंग जंग पछाडूनही सलग पाच वेळा म्हणजेच गेली पंचवीस वर्षे या मतदारसंघावरची पकड कायम ठेवणाऱ्या आमदार जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. नेहमीप्रमाणे याही वेळी चर्चेत नसला तरच नवल. आघाडी सरकाच्या काळात अनेक वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या जयंत पाटील यांनी या मतदारसंघाचा विकास जरुर केला. पण, तरीही पेठनाका-सांगली रस्त्याचे रुंदीकरण, ग्रामीण-शहरी भागातील रस्त्यांची दूरवस्था, मिरज तालुक्यातील क्षारफुटीच्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न, ऊसदराचा प्रश्न, जलस्वराजच्या पाणी योजनेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष या नेहमीच्याच समस्या सोडविण्यास जयंत पाटील यांना म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे हे प्रश्न निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी असतात. दरम्यान, 2014 मध्ये सत्तापरिवर्तन झाले. सत्ताधारी भाजपने राज्यतील इतर मतदारसंघाप्रमाणे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचे जाळे उदद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. परिणामी या मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. त्यामुळे या वेळी या मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे नक्की.

इस्लामपूर विधानसभा निवडणूक 2014  निकाल

विधानसभा निवडणूक 2014 मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विजयी झाले. जयंत पाटील यांना 1,13,045 मते मिळाली. या निकालावर कटाक्ष टाकता अभिजीत पाटील (अपक्ष ) 37,859, जितेंद्र पाटील (काँग्रेस) 37,8 87 , बी. जी. पाटील (अपक्ष) –5,830, उदय पाटील (मनसे) – 1234 इतकी मते मिळाली.

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ

भौगोलिक दृष्ट्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांना लागून असलेला आणि कायम दुष्काळी अशी ओळख असलेला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ. गेली अनेक वर्षे राजकारणाच्या पटावर तसा फारसा चर्चेत नसलेला. परंतू गेल्या काही वर्षांमध्ये खास करुन 2014 विधानसभा-लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विशेषत्वाने चर्चेत आलेला असा हा मतदारसंघ. शिवसेना पक्षाचे अनिल कलेजेराव बाबर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. अनिल बाबर यांच्या रुपाने या मतदारसंघातून पहिल्यांदाच हिदुत्ववादी विचारांच्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून निवडूण आला. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. स्वत: अनिल बाबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही या मतदारसंघातून दोन ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांना जोरदार टक्कर दिली होती. सध्या युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आहे. दरम्यान, मधल्या काळात पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा हात हाती घेतला होता. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

 • अनिलराव कलजेराव बाबर, शिवसेना – 72,849
 • सदाशिवराव पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 53,052
 • गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पक्ष – 44,419
 • अमरसिंह देशमुख, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 39,725
 • सुभाष पाटील , अपक्ष- 3,090

जत विधानसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ क्रमवारीत जत विधानसभा मतदारसंघ हा 288 व्या क्रमांकाला आहे. भारतीय जनता पक्षाचे विलासराव नारायण जगताप हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी 72,885 मते मिळवत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विक्रम सावंत यांना पराभूत केले. विक्रम सावंत यांना 55,187 मतं मिळाली.

जत विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

 • विलासराव नारायण जगताप, भारतीय जनता पक्ष – 72,885
 • विक्रम सावंत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 55,187
 • प्रकाश शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 30,130
 • जकापा सारजे, बहुजन समाज पक्ष – 2,928
 • संगमेश्वर तेली, शिवसेना – 1,928

तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघ

तासगाव-कवठे-महांकाळ या मतदारसंघ हा संपूर्ण महाराषट्राला परीचित. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा हा मतदारसंघ. आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन रावसाहेब आर.आर. पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इथे आमदार आहेत. तासगाव आणि कवठे-महांकाळ तालुक्यातील काही भाग असा संयुक्त असलेला हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील तितका जागरुक म्हणूनही ओळकला जातो. काँग्रेस नेते दिवंगत दिनकर आबा पाटील यांनीही या मतदारसंघातून नेतृत्व केले आहे. आर. आर. पाटील या तळागाळातून आलेल्या या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्रावर छाप पाडली. त्यामुळे या मतदारसंघाचे राज्यभर नाव झाले.

तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघ 2014 निवडणूक निकाल

 • श्रीमती सुमन रावसाहेब आर.आर. पाटील , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – 1,31,236
 • अॅड. स्वप्नील दिलीपराव पाटील , अपक्ष –18,273
 • प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे, प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष – 1062

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.