Sangamner: खळबळजनक! जमीनीच्या वादातून एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; संगमनेर येथील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून सर्वांनाच हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. संगमनेर (Sangamner) तालुक्यात एका वृद्ध व्यक्तीने आज (26 जानेवारी) सकाळी जमीनीच्या वादातून पोलीस स्टेशनमध्येच पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. यात संबंधित व्यक्ती 60 टक्के भाजला गेला असून जवळच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

अनिल शिवाजी कदम (वय, 70) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कदम यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी सादिक रज्जाक शेख आणि सुमय्या सादिक यांच्याशी जमीनीचा व्यवहार झाला होता. मात्र, काही कारणांमुळे दोघांत वाद झाला. अखेर हे प्रकरण कोर्टात गेले. सादिकच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढा, अशी मागणी अनिल हे पोलिसांकडे करत होते. परंतु, हे प्रकरण कोर्टात गेल्याने पोलिसांनी यात असमर्थता दर्शवली. दरम्यान, अनिल यांनी आज सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन अंगावर रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात अनिल हे 60 टक्के भाजले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे देखील वाचा- Mumbai Pune Expressway: भयंकर! रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनीअरचा रोड रोलरखाली चिरडून दुर्देवी मृत्यू

महत्वाचे म्हणजे, अनिल कदम यांनी 3 दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात 25 जानेवारी रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र दिले होते. मात्र, त्याला आत्महत्यापासून परावृत्त करण्यात पोलिसांना अपयश आले होते. मागील वर्षी सुद्धा अनिल कदम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.