Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर प्राणघातक हल्लानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पण हल्लेखोरांवर किंवा संशयितांवर बोलण्यावर मात्र त्यांनी टाळलं आहे. प्रकरण तपासाधीन असल्याचं सांगत त्यांनी कुणाचेही थेट नाव घेणं टाळलं आहे. पण शिवाजी पार्क मैदान परिसरात स्टंप घेऊन हल्ला करणार्‍यांचे 'कोच' कोण हे आम्हांला ठाऊक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फोन वरून चौकशी करत त्यांनी संरक्षणाला 2 पोलिस दिले आहेत पण आपण ही सुरक्षा विनम्रतापूर्वक नाकारत असल्याचं म्हटलं आहे.

संदीप देशपांडे यांनी पोलिस संरक्षण आता मला नाही तर ज्यांनी हल्ला केला त्यांना गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या क्राईम ब्रांच कडून आज सकाळी भांडूप च्या कोकण नगर भागातून 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे.

संदीप देशपांडे यांनी आज पुन्हा 'विरप्पन टोळीचा' उल्लेख करत मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडून घोटाळे उघड केले जात आहेत. त्यापैकी एका फर्निचर कंपनीच्या घोटाळ्याचा सुगावा लागल्याने कदाचित हा हल्ला झाला असावा असं म्हटलं आहे. आपण पुन्हा इक्बाल सिंह चहल यांना भेटून घोटाळ्याबाबतच्या माहितीचा आढावा घेणार असल्याचं म्हटलं आहे. 'माझं तोंड बंद करायचं होतं तर थोबाडावर हल्ला करायचा होता' असंही देशपांडे म्हणाले आहेत. हल्लेखोरांनी माझ्या मदतीला येणार्‍यांना धमकावल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत पुन्हा लक्ष्य

संदीप देशपांडे यांच्यासोबत अमेय खोपकर देखील पत्रकार परिषदेमध्ये हजर होते. संजय राऊत यांनी संदिप देशपांडे यांच्यावरील हल्लावर प्रतिक्रिया देताना 'जर शिवसैनिकाने हा हल्ला केला असता तर तो 8 दिवस कोमात असता' असं वक्तव्य केले आहे. यावर राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यांनी उपचारांची गरज असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा शिवसेना माथाडी सेनेचा उपाध्यक्ष आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्येही त्याचा चेहरा कैद झाला आहे.