Shiv Jayanti 2021: सातारा शहर विक्रीसाठी ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, पुतळे आणि भगव्या झेंड्यांनी सजले
Shivaji Maharaj Birth Anniversary (Photo Credits: Wikimedia Commons)

Shiv Jayanti 2021: छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या म्हणजेचं 19 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होणार आहे. महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आजपासून शिवभक्तांची लगबग सुरू झाली आहे. अनेकजण शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळा तसेच भगवा झेंडा विकत घेण्यासाठी उत्सुक आहे. अशातचं सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, प्रतिमा विक्रीसाठी मांडल्या आहेत. शिवरायांच्या प्रतिमा आणि पुतळ्यामुळे सातारा शहराला नवा साज चढला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नागरिकांना शिवजयंती कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सातारा शहरात तरुणांमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक युवकांनी शिवजयंतीनिमित्त भगवा झेंडा तसेच शिवरायांच्या प्रतिमा, पुतळे खरेदी केले आहेत. (वाचा - Raigad Shiv Jayanti 2021: 19 आणि 20 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर निशुल्क प्रवेश)

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवजयंती अगदी साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून साजरी करण्यात यावी. याशिवाय शिवजयंती निमित्त सामूहिक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन न करता रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारी 4,787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात काल 3,853 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.