Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

राज्यात मागील काही काळापासून सचिन वाझे प्रकरणावरुन (Sachin Vaze Case) वादंग उभा राहिला आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमातून रंगत आहेत. यावर अखेर गृहमंत्र्यांनी मौन सोडले असून या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'प्रसारमाध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या माझ्या राजीनाम्याच्या बातम्या निराधार आहेत', असं अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "विदर्भाच्या मिहान प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यासाठी आज मी पवार साहेबांना भेटलो. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणात एटीएस आणि एनआयएने गेल्या 2 दिवसात केलेल्या तपासाबद्दलही आम्ही चर्चा केली. प्रसारमाध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या माझ्या राजीनाम्याच्या बातम्या निराधार आहेत."

गृहमंत्री अनिल देशमुख ट्विट:

(Anil Deshmukh On Param Bir Singh: न सांगता येण्यासारख्या चुका घडल्यानेच परम बीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई- अनिल देशमुख)

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा एनआयए आणि एटीएस करत असलेल्या तपासातील घडामोडींची माहिती शरद पवारांना देण्यासाठी अनिल देशमुख आज दिल्लीत गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी राजीनामाच्या बातम्यांबद्दल खुलासा केला आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात NIA आणि ATS योग्य पद्धतीने करत असून त्यांच्या तपासानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.