Congress Leader Sachin Sawant (PC - ANI)

तमाम देशवासियांचे अयोध्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) स्वप्न लवकरच सत्यात अवतरणार आहे. त्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. मात्र यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधत 'अयोध्या राम मंदिर चंदा हा भाजपचा धंदा' असल्याची जहरी टिका केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा घणाघाती आरोप केला आहे. भाजपने राम मंदिर मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत यांनी यावर अधिक बोलताना सांगितले की, " राम मंदिर निर्मितीकरता निधी संकलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोक सहभागी होत आहेत. पण ह्या कार्यक्रमात भाजप आणि RSS सहभाग चिंताजनक आहे. यातून जनतेला लुबाडण्याची शक्यता आहे. भाविकांचे मेहनतीचे पैसे राम मंदिर निर्माण आणि ट्रस्टला जाईल याची जनतेने काळजी घ्यावी. रोखीने पैसे गोळा केला जातो त्यात अपहार होऊ शकतो." अशी चिंता सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.हेदेखील वाचा- Raj Thackeray यांच्या अयोध्येला जाण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत केली 'ही' मोठी घोषणा

4 जानेवारी 2021 रोजी हिंदू महासभेने भाजपने निधी गोळा करू नये असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपला तिथे राम मंदिर कधीच नको होतं. गेल्या तीन दशकात भाजपने जमा केलेल्या पैशाचा हिशोब दिला नाही. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. हे हिंदू महासभा बोलत आहे. त्यांनी कोर्टात जायचा इशारा दिला आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान सचिन सावंत यांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याविषयी विचारले असता, " तो वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं. मनसे भूमिका काय असते हे राज ठाकरेही सांगू शकत नाहीत. जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार" असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.