अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच Enforcement Directorate म्हटलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. आजकाल ईडी (ED) नावाने प्रचलीत झालेले हे संचालनालय अनेकांच्या बेहिशेबी मालमत्ता आणि इतर कारनामे उघडकीस आणते. त्यामुळे राजकारणी, उद्योगपती, खेळाडू आणि उच्चभ्र म्हणवणारी आणि गरजेपेक्षा काहीसा अधिकचा पैसा गाठीला मारणारी मंडळी ईडीला चांगली टरकून असतात. पण, आता चक्क ईडी अधिकाऱ्यांनाही ईडीला टरकून राहावे लागेल असे दिसते. ज्येष्ठ आयआरएस अधिकारी (Senior IRS Officer) आणि ईडीचे माजी कर्मचारी राहिलेल्या सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या घराव ईडीने नुकतीच छापेमारी केली.
धक्कादायक म्हणजे ईडीने केलेल्या कारवाईत चिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे आजवर केवळ राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रेटी आणि इतर मंडळींना रडारवर घेणारी ईडी आता त्यांच्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करु लागली आहे. त्यामुळे आता आगामी काळात विद्यमान ईडी अधिकारी विरुद्ध माजी ईडी अधिकारी असा सामना रंगण्याची चिन्हे अधिक आहेत.
सचिन सावंत हे सध्या सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत आहेत. 500 कोटी रुपयांच्या कथीत घोटाळ्यात ईडीने कारवाई करत त्यांच्या घरावर छापा मारला. प्रदीर्घ काळ तपास सुरु केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. सावंत यांच्यावर 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या इतरत्र वळवल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्यांच्यावर सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. त्याच प्रकरणात ईडीने कारवाई करत त्यांच्या घरी छापा टाकला होता.
सचिन सावंत हे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारी सेवेत आणि तेही वरीष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तीवरच धाड टाकल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आता या कारवाईत आणखी काय काय पुढे येते याबाबत उत्सुकता आहे.