खडसे, बावनकुळे, तावडे, मुंडे यांची तगमग पाहता राजकीय भुकंप नको असेल तर विरोधी पक्षाने सावध आणि आत्मनिर्भर व्हावं; सामना अग्रलेखातून भाजपची कानटोचणी
Bjp Leader | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या बैठकीत काँग्रेस (Congress) नेत्यांची अनुपस्थिती पाहता भविष्यात महाविकास आघाडीमध्ये भूकंप होण्याची शक्यता वर्तवणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांवर आजच्या सामना अग्रेलेखातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. सध्या विरोधी पक्ष भाजप मध्येच अनेक मंडळी नाराज आहेत, ज्यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule), एकनाथ खडसे (Eknath Khadse) , विनोद तावडे (Vinod Tawade), अशा मंडळींचा सुद्धा समावेश आहे, यांच्या मनातील तगमग आणि तळमळ पाहता भविष्यात जर राजकीय भूकंप नको असले तर स्वतः भाजपनेच सावध व्हायला हवं असा कानटोचणीचा सल्ला सुद्धा अग्रेलखातून देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार हे आत्मनिर्भर (Atmanirbhar) आहे, राज्यात आणि विरोधी पक्षात अस्थिरता मिटवायची असेल तर भाजपने सुद्धा आत्मनिर्भर व्हावे जेणेकरून राजकारणशिवाय कोरोना विषाणूंची लढण्यासाठी बळ मिळेल असेही या अग्रलेखात म्हंटले आहे. Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सहित तुमच्या शहरात COVID19 चे किती रुग्ण?

काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख

उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा करत राज्याला अस्थिर होण्यापासून वाचवले पण यामुळे सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास कोणताही धोका नाही (तसा तो कधीच नव्हता) आणि राज्यातील महाविकास आघाडीसही इजा पोहोचणार नाही. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्यावर आगपाखड

विरोधी पक्षातील चंद्रकांतदादा सरकारमध्ये भूकंप घडवून आणू पाहात असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे. यापूर्वी सुद्धा अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सज्जनतेचे प्रमाणपत्र दिले, तसे पाटीलही सज्जन आहेत, त्यांच्या दुर्जनतेचे पुरावे काही अजून समोर आलेले नाहीत मात्र सध्याच्या गटारी राजकारणात सज्जनांचे मुखवटे गळून पडत आहेत.

दरम्यान, राजकारणात तसेच सब घोडे बाराटकेच असतात पण त्यातही ज्यांच्यावर मांड ठोकून दिवस काढता येईल तो जनतेला जवळचा वाटतो. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती, पण जेव्हा आता महाराष्ट्र कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूशी झुंज देत आहे तेव्हा हा राजकीय विषाणू विरोधकांच्या डोक्यात वळवळावा हे योग्य नाही असे म्हणत भाजपला शिवसेनेच्या मुखपत्रातून आज टोलवण्यात आले आहे.