अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे. या लेखावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या टीकेवर आता अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे. (हेही वाचा - Mohit Kamboj Post: 'एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल', मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्र्यांना दिला इशारा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे, असं ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी लेख लिहिला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही या लेखातून करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असे देखील या लेखात लिहले आहे.
दरम्यान या लेखावर अजित पवारांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे. “मला यासंदर्भात काहीही बोलायचं नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपलं मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार मी करतो आहे. " असे अजित पवारांनी म्हटले आहे.