Ajit Pawar On Shivsena: 'बंड होणार आहे, मी उद्धव ठाकरेंना आधीच इशारा दिला होता पण...'; शिवसेनेच्या फुटीवर अजित पवारांनी अगोदरचं केली होती भविष्यवाणी
Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

Ajit Pawar On Shivsena: गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. राष्ट्रवादीचे नेते आणि एमव्हीए सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी या फुटीवर मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आधीच इशारा दिला होता की, त्यांच्या पक्षात बंडखोरी होणार आहे, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांच्या पक्षातील वाढत्या बंडखोरीबाबत आम्ही उद्धव ठाकरेंना दोन-तीन वेळा माहिती दिली होती आणि यासंदर्भात काही बैठकाही घेतल्या होत्या. मात्र त्यांचा आमदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. ते एवढे मोठे पाऊल उचलणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. (हेही वाचा -Mumbai: आदित्य ठाकरेंनी साधला CM Eknath Shinde यांच्यावर निशाणा; म्हणाले- 'हा जनतेच्या पैशाचा अपव्यय’, जाणून घ्या सविस्तर)

अजित पवार पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवर आंधळा विश्वास ठेवला. त्यांनी उद्धव यांचा विश्वासघात केला, त्यांनी असे का केले हे मला अजूनही समजू शकलेले नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या गटाने शिवसेना आमदारांसह उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी तडजोड केली आहे, त्यामुळे त्यांना बंडखोरी करावी लागत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 39 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी शिवसेनेवर दावा ठोकत भाजपसोबत सरकार स्थापन केले.