Savaniee Ravindrra: लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) चौथ्या टप्प्यात आज पुण्यामध्ये मतदान होत आहे. त्या दरम्यान, मतदान प्रक्रियेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अनेक जणांची नावे मतदार यादीत नसल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. यात प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रला (Savani Ravindra) मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबद्दलचा संताप तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे सावनीला मतदान न करताच घरी परतावे लागले. सावनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदानाची शाई नसलेल्या बोटाचा फोटो टाकला आहे. (हेही वाचा:Pune Lok Sabha Election: मतदान केंद्रांच्या 100 मीटर आवारात मोबाईल फोनवर बंदी; पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती (Watch Video) )
सावनी रवींद्रने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज वोटिंग बूथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी.) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही.'
तसंच, 'या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली. त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक.', असे सावनीने सांगितले. मतदान न करता आल्यामुळे सावनीने संताप व्यक्त केला आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.