
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) महाराष्ट्रात पसरत चाललेला फैलाव थांबविण्यासाठी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मुंबईतील अत्यावश्यक सेवा कोणकोणत्या असतील याबाबतची नियमावली तयार केली आहे. या नियमावलीत उपाहारगृहे सुरु ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी खूपच चिंताजनक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओ द्वारा सांगितले. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. या दरम्यान उपहारगृहे सुरु ठेवण्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. लॉकडाऊन करुन भागेल असे वाटत नाही संचारबंदी लागू करा; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती
पाहूयात काय आहेत अटी:
1. एकावेळी क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक बसतील, याची काळजी मालकांना घ्यावी लागणार आहे.
2. दोन ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवून त्यांची आसनव्यवस्था करावी लागणार आहे.
3. खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास किंवा घरपोच देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वर दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास उपहारगृहांच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही प्रशासनाने सांगितले आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या धोक्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. तसंच पूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड येथे लागू करण्यात आलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असून इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसंच गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला लॉकडाऊनचा आदेश फारसा गंभीरतेने घेतला जात नसल्याचे लक्षात येता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन केले आहे. कोरोना विरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या, असे ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सूचित केले आहे.