मुंबई सह महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येमध्ये होणारी विस्फोटक वाढ ही भीतीदायक आहे. यामध्ये अतिगंभीर रूग्णांना वेळीच उपचार देण्यामध्ये यंत्रणा तोकडी पडत असल्याचं चित्र असताना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडूनच या आरोग्य संकटाच्या काळात औषधांचा काळाबाजार होत असल्याचं चित्र आहे. TOI च्या बातमीनुसार, मुंबई मध्ये पॅरामेडिक, मेडिकल विद्यार्थी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह यांनी मिळून रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआर कडून कायदेशीर पद्धतीने फार्मसी मधून इंजेक्शन घेण्यात आले पण त्याच्या साथीदाराने ते बाजारात वाढवलेल्या किंमतीमध्ये विकलं.
मालवणी पोलिस स्टेशन मध्ये एकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ओळखीचा एका पॅरॅमेडिकल रेमडेसीवीर प्रत्येकी 20 हजाराला विकत आहे बाजारत त्याची किंमत सुमारे 5600 च्या आसपास आहे. पॅरामेडिकने असा देखील दावा केल्याचं सांगितलं जात आहे की बाजारात हे इंजेक्शन अजून अधिक किंमतीने विकून देखील नफा मिळवता येऊ शकतो. ही माहिती एफडीए ला दिल्यानंतर त्यांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरामध्ये सापळा रचून 13 एप्रिलला आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान हे आरोपी 28-30 वर्षांचे आहेत आणि कांदिवलीचेच रहिवासी आहेत.
सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर मध्ये रेमडेसीवीर लसीचा तुटवदा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अनेक मेडिकल स्टोअर बाहेर रूग्णांच्या नातेवाईकांची लांबच लांब रांग देखील पहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई मध्ये पालिका आयुक्तांनी रेमडेसीवीरचा पुरेसा साठा असल्याचं सांगितलं आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनी देखील डॉक्टरांना सरसकट रेमडेसीवीर न देण्याच्या सूचना दिल्या आहेत.