Refinery Project In Konkan: राजापूर मध्ये रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थकांची Aaditya Thackeray यांनी घेतली भेट
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

तीन दिवसांच्या कोकण दौर्‍यावर असलेल्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांचे काल सिंधुदुर्ग मध्ये आगमन झाल्यानंतर आज ते रत्नागिरीच्या दिशेने निघाले आहेत. या दरम्यान त्यांनी आज दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी राजापूर (Rajapur) मध्ये रिफायनरी प्रोजेक्टच्या समर्थकांची धावती भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी स्थानिकांकडून निवेदनं स्वीकरत काही मिनिटं त्यांच्याशी संवाद साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पाच्या समर्थकांची भेट घेताना महिलावर्गाशी संवाद साधला. ' जेव्हा कोणताही मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा सुरूवातीला कंपनी आणि स्थानिकांचं बोलणं गरजेचे आहे. तुम्ही आधी यामधून भूमीपुत्रांना किती नोकर्‍या मिळणार, प्रकल्पाशी संबंधित फायदे-तोटे समजून घ्या, स्थलांतर कसं होणार ते जाणून घ्या  आणि जर स्थानिकांनी पाठिंबा दिला तर नक्कीच आपण त्यांच्या पाठीशी असू' असं सांगितलं आहे. कोकणात एक चांगला प्रकल्प घेऊन येण्यासाठी मी देखील प्रयत्नशील असल्याचं आदित्य ठाकरेंनी आश्वासन दिलं आहे.

पहा काय म्हणाले आदित्य ठाकरे

कोकणात नाणार मध्ये होणारा हा रिफायनरी प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे बारगळला आहे. आता तो राजापूर मध्येच धोपेश्वर - सोलगाव भागात हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सध्या स्थानिकांचा अंदाज घेऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते. आज राजापूर जिल्ह्यामध्ये समर्थक आणि विरोधक यांनी या प्रकल्पाबाबत पोस्टरबाजी केलेली पहायला मिळाली आहे.