Ravindra Waikar PC ANI

आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील त्यांच्या विश्वासूंपैकी एक रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी अखेर शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. आज रविंद्र वायकर यांचा 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची बातमी ABP Majha कडून देण्यात  आली आहे. रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील बीएमसीचा भूखंड लाटल्याचा आरोप आहे. या कथित आरोपाविरूद्ध सध्या ते ईडीच्या रडारवर देखील आहेत. ठाकरे गटाकडून रविंद्र वायकर यांच्यावर दबाव असल्याचे देखील अनेकांनी यापूर्वीच सांगितलं आहे.

रविंद्र वायकर हे जोगेश्वरीमधून 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर 2006-2010 या काळात वायकर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा ते जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपद सांभाळले.

रविंद्र वायकर ईडीच्या रडार वर

जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडी कडून रविंद्र वायकर यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी घरावर ईडीने देखील धाड टाकली होती. मुंबई महापालिकेच्या बागेच्या जागेवर बांधकाम झाल्याची तक्रार आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर पालिकेच्या भूखंडावर हे बांधकाम झाल्याचा आरोप आहे. पालिकेच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधली असून तिची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ईडी कारवाई नंतर एकनाथ शिंदे आणि रविंद्र वायकर यांची गुप्त भेट झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. अखेर आज रविंद्र वायकर शिंदे गटात सामील होत आहेत.

वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप कॉंग्रेसच्या संजय निरुपम यांनी देखील केले होते. पण ते सिद्ध करू शकले नव्हते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी अन्वय नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा केला होता. याचे आर्थिक व्यवहार देखील लपवल्याचा आरोप आहे.

मुंबई मध्ये काल शिवसेना शाखांना भेटीसाठी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आले असता रविंद्र वायकर त्यांच्या स्वागताला दिसले होते. आज त्यांच्या भेटीनंतर दुसर्‍याच दिवशी रविंद्र वायकर शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना पक्षात सहभागी होत आहेत.