Navneet Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घेऊन आले आहे. या योजनेची अद्यापही पूर्तता होणे बाकी आहे तोवरच सरकार समर्थक आमदारांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. रवी राणा (Ravi Rana) असे या आमदार महोदयांचे नाव असून, आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर भाऊ म्हणून दिलेले 1500 रुपये काढून घेऊन अशी तंबीच त्यांनी बहिणींना दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. आमदार राणा हे भाजप आणि राज्य सरकारचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हातीत आयतेच कोलीत मिळाले आहे.

रवी राणा यांच्या वक्तव्यावरुन वाद

अमरावती येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण कार्यक्रमात आमदार रवी राणा बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, राज्य सरकार या योजनेंतर्गत 1500 रुपये देत आहे. मात्र, लवकरच आम्ही ही रक्कम दुप्पट करणार आहोत. म्हणजेच ही रक्कम 3000 इतकी होणार आहे. राज्य सरकार देत आहे. पण, ज्याचं खाल्ल आहे त्याला जागलं पाहिजे. सरकार देत राहतं.. पण सरकारने दिले की त्यांना आशीर्वादही मिळायला हवा. जर मलाही आशीर्वाद मिळाला नाही तर मिळालेले 1500 रुपये भाऊ म्हणून काढून घेऊ, असेही राणा या वेळी म्हणाले. राणा यांच्या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली असून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. (हेही वाचा, Theft in Navneet Rana's House: नवणीत राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी, फरार नोकरावर गुन्हा दाखल)

योजना जाहीर, पण लाभ कधी?

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा तर केली. ही योजना सध्या महिलांमध्ये जोरदार लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भरण्यासाठी महिला सरारी कार्यालये आणि महा-ई सेवा केंद्रांमध्ये गर्दी करत आहेत. दरम्यान, या योजनेचा हाप्ता कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही निश्चिती नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हे पैसे केव्हा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी या योजनेचे पैसे भाऊबीजेला खात्यावर जमा होतील, असे वक्तव्य केले होते. मात्र, पुढच्या काहीच क्षणामध्ये आपल्या वक्तव्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी बाजू सावरुन घेतली. या योजनेचे पैसे येत्या 17 ऑगस्ट रोजी खात्यावर जमा होतील, असे ते म्हणाले. पण, असे असले तरी त्यांच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला तो झालाच.