सुरक्षित शहर मुंबईत बलात्काराचे प्रमाण 22 टक्क्यांनी, तर विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये 51 टक्के वाढ- रिपोर्ट
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये गणल्या गेलेल्या महानगरात, म्हणजेच मुंबईमध्ये (Mumbai)  गेल्या चार वर्षांत बलात्काराच्या (Rape) घटनांमध्ये 22 टक्के आणि विनयभंगाच्या (Sexual Assault) घटनांमध्ये 51 टक्के वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे बलात्काराचा बळी ठरलेल्यांमध्ये 69 टक्के अल्पवयीन आहेत. प्रजा फाउंडेशनने (Praja Foundation) दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार किंवा विनयभंगाची प्रकारने पॉक्सो कायद्यांतर्गत येतात. फाउंडेशनचे संस्थापक निताई देसाई यांनी गुरुवारी सांगितले की, ‘केवळ पॉक्सो अंतर्गत, 2018-19 मध्ये नोंदवलेच्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये 69 बळी 6 वर्षांखालील आहेत.

पॉक्सो प्रकरणात, 90% गुन्हेगार हे पीडित व्यक्तीच्या ओळखीचे लोक असतात. यापैकी गेल्या एक वर्षात वडील, मुलगा आणि भाऊ असे नात्यातील लोक 14 प्रकरणात आरोपी होते, तर 39 प्रकरणात कौटुंबिक मित्रांनी लैंगिक अत्याचार केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे ओळख झालेले मित्र हे 284 घटनांमध्ये आरोपी ठरले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, 'ही कायदा व सुव्यवस्थेची समस्या नाही. तर हा आपल्या समाजासाठी एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपल्या मुलांसोबत अशा प्रकारची कृत्ये ही जवळच्या लोकांकडून केली जात आहे हे दुर्दैव आहे. या प्रकरणास सामोरे जाण्यासाठी कित्येक पातळ्यांवर आणि मंचांवर त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे.’

(हेही वाचा: मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा)

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे 22,845 घरांमध्ये जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले, तेव्हा बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली नसल्याचे समोर आले. म्हणूनच पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असावे अशी शंका आहे. प्रजा फाउंडेशनच्या सर्वेक्षणानुसार, शहरातील 28 टक्के लोकांसमोर अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत, परंतु त्यातील 59% लोकांनी याची पोलिसांना माहिती दिली नाही. तर ज्यांचाबाबत  गुन्हा घडला आहे त्यांच्यापैकी 43% लोक पोलिसांकडे तक्रारी घेऊन गेले नाहीत.