देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच नागपूर (Nagpur) येथील एका तरूणाने घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (24 मार्च) दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजदेव टेंगर शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नागपूर एमआयडीसी परिसरातील रहिवाशी आहे. राजदेवच्या घराशेजारी एक दाम्पत्य राहते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. घरातील परिस्थिती बिकट असल्यामुळे दोघे पती-पत्नी कुटुंबाचा उदर निर्वाह चालवतात. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे बुधवारी कामाला गेले होते. तर, त्यांची मोठी मुलगी शिवणक्लासला गेली होती. त्यामुळे घरात केवळ त्यांची 10 वर्षांची मुलगी आणि तिचा छोटा भाऊ होता. या संधीचा गैरफायदा घेत आरोपी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास पीडिताच्या घरी गेला. त्यानंतर तिच्या छोट्या भावाला खाऊसाठी पैसे दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना समोर येताच परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हे देखील वाचा- Nagpur Central Jail: नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार; 7 पोलीस कर्मचारी आणि 2 गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपीच्या विरोधात याआधीही विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, छोटी मोठी कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले होते, अशीही माहिती समोर येत आहे. तसेच याप्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पीडिताच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.