सोशल मीडियावर एका महिलेशी मैत्री करून तिला आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीला गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपी सुहास कांबळे याने शहराच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या पीडितेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. जेव्हा तिने विनंती स्वीकारली नाही, तेव्हा त्याने तिला फेसबुक मेसेंजरवर संदेश पाठवण्यास सुरुवात केली ज्याला तिने प्रतिसाद दिला.
यानंतर, त्यांच्यात नंबरची देवाणघेवाण झाली आणि काही काळाने त्यांच्यात बोलणे झाले. त्यांच्या संभाषणादरम्यान, महिलेने त्याला सांगितले की तिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि ती आणि तिचा नवरा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. तिने सांगितले की तिच्या पतीने मित्राकडून कर्ज घेतले होते जे ते फेडण्यास सक्षम नव्हते. ती पुढे म्हणाली की, तिच्या पतीचा मित्र पैसे परत करण्यासाठी त्यांना त्रास देत होता. आरोपीने तिला सांगितले की तो त्यांना पैशाची मदत करू शकतो आणि महिलेला चेंबूर येथे भेटण्यास सांगितले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने तिला आर्थिक मदत दिली नाही. महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्याने पैसे देण्याचे आश्वासन देऊन तिला पुन्हा चेंबूरला बोलावून घेतले, परंतु पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर, महिलेने तिच्या पतीला सांगितले, त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात संपर्क साधला जेथे आरोपी व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा Dowry: हुंड्यासाठी महिलेला जिवंत जाळले, पतीसह सासरच्या मंडळींना अटक
पोलिसांच्या पथकाने गुरुवारी कांबळेला त्याच्या राहत्या घरातून अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहेत, ज्यात त्याचे कॉल रेकॉर्ड, लॉजच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे आहेत.