Mumbai: देशात कोरोना संकट अधिक गडद होत आहे. अशातचं राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. मुंबईत एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. मेडिकलला शिकणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने या चिमुरडीवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी भागातील बेहराम बाग नावाच्या परिसरात पाच वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बलात्कार केला. सुनील सुखराम गुप्ता, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सुनील हा पीडितेच्या घर मालकाचा मुलगा आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संबंधित परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वाचा - डोंबिवलीमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर सोडले कुत्रे; पोलिस शिपाई जखमी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे कुटुंब आरोपीच्या घरात वरच्या माळ्यावर राहते. गुरुवारी संध्याकाळी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्यावेळी नराधम आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्याने पीडितेने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान, त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने याप्रकरणी आरोपीविरोधात ओशीवरा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पीडितेच्या आई-वडिलांकडून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.