Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

राज्यसभा निवडणूक 2022 (Rajya Sabha Elections 2022) मध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या पराभवाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची एक बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीतील रणनितीबाबत उहापोह करण्यात आला. शरद पवार यांनी महाविकासआघाडीची मते फुटलीच कशी असा सवाल नेत्यांना केला. तसेच, राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काळजी घ्या, अशा सूचनाही पवार यांनी दिल्याचे समजते.

राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या झालेल्या पराभवाबद्दल शरद पवार यांची नाराजी लपून राहिली नव्हती. या पराभवाबद्दल शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, देवेंद्र फडणवीस हे माणसं जोडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी केलेली खेळी योग्य ठरली. महाविकासआघाडी काही गोष्टींमध्ये कमी पडली. त्यानंतर महाविकासाघाडीतील नेत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर चर्चाचर्वण झाले ते आजही सुरु आहे. अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. मते फुटलीच कशी. (हेही वाचा, MLC Elections 2022: राज्यात विधानपरिषद बिनविरोध की निवडणूक लागणार? आज फैसला)

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र महाविकासआघाडीच्या पराभवाचे खापर अपक्षांवर फोडले आहे. काही अपक्षांचा नामोल्लेख करत त्यांनी महाविकासाघाडीला मते न दिल्यानेच पराभव झाला अशी भावना व्यक्त केली. त्याला अपक्षांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठक महत्त्वाची ठरते आहे.