Raju Shetti| (Photo Credits: YouTube)

महाविकासाघाडीमधील (Maha Vikas Aghadi) खदखद राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या रुपात अखेर बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथून आज निर्णय जाहीर करत स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana ) ही महाविकासआघाडीमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. राजू शेट्टी हे पाठीमागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. या बातम्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. आजपासून महाविकासआघाडीसोबतचे सर्व संबंध संपल्याचे मी आपल्यावतीने जाहीर करतो. आजवर दिल्लीवाल्यांनी फसवलं आता मुंबईवाल्यांनीही फसवलं. त्यामुळे एणाऱ्या काळात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ आणि स्वत:च्या मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तडफडून मरण्यापेक्षा लढून मरणे केव्हाही चांगले, असेही राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला. राजू शेट्टी यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की, महाविकासआघाडी सोबत राहायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय येत्या 5 एप्रिल रोजीच जाहीर करु. राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचे संकेतच जणू त्या वेळी दिले होते. दरम्यान, शेट्टी यांनी आज थेट निर्णयच जाहीर करुन टाकलाआहे. (हेही वाचा, US Parishad 2021: राजू शेट्टी यांचा प्लॅन काय? महाविकासआघाडीची साथ सोडणार? ऊस परिषदेत मोठं विधान, शरद पवार आणि भाजपवरही टीकास्त्र)

पाठिमागील काही काळापासून राजू शेट्टी आणि महाविकासाघाडी यांच्यातील संघर्ष वाढला होता. राज्यपाल कोठ्यातून विधानपरिषदेवर जाणाऱ्या सदस्यांमध्ये राजू शेट्टी यांचे नव होते. मात्र, पुढे हे नावही राज्यपालांच्या आक्षेपावरुन वगळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारने पाठविलेल्या यादीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासह जवळपास 12 जणांची नावे तशीच रखडली आहेत. विधानपरिषदेवर जाण्यासाठी विलंब लागत असल्याने राजू शेट्टी आणि महाविकासआघाडी यांच्यात एक सुप्त संघर्ष पाठीमागील अनेक दिवसांपासून सुरु असल्याची चर्चा होती.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय तर जाहीर केला. पण आता ते कुठे जाणार याबाबत उत्सुकता आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असणारे राजू शेट्टी मधल्या काळात भाजपसोबत गेले. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडत महाविकासआघाडीमध्ये प्रवेश केला. मात्र आता ते त्यातूनही बाहेर पडले. त्यामुळे शेट्टी आता पुन्हा एकदा एकला चलोचा नारा देणार की अन्य कोणत्या युती आघाडीशी जुळवून घेणार याबाबत उत्सुकता आहे.