महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संदेश दिला आहे. साधारण दोन मिनीटांच्या या ऑडीओ क्लिप संदेशात त्यांनी कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे. या अवाहनात ते म्हणतात की, येत्या 14 तारखेला माझा (राज ठाकरे) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण नेहमीच मला भेटून शुभेच्छा देता. मात्र, या वेळी मला भेटायला कोणीही येऊ नये. मी कोणालाही भेटणार नाही. त्यामुळे आपण जिथे कुठे असाल तिथेच राहा'. राज ठाकरे यांनी वाढदिनी कार्यकर्त्यांना न भेटण्यामागे वैद्यकीय शस्त्रक्रियेचे कारण दिले आहे.
राज ठाकरे यांनी ऑडिओ संदेशात काय म्हटले?
राज ठाकरे यांनी आपल्या ऑडीओ क्लिपमधील संदेशात म्हटले आहे, ''त्या दिवशी पुण्याला जी सभा झाली आपली. त्या सभेत मी सर्वांना सांगितले की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी हॉस्पिटलला अॅडमीट झालो. सर्व टेस्ट वैगेरे झाल्या. त्याच रात्री डॉक्टरांनी मला सांगितले, 'कोविडचा डेड सेल आहे'. ते काय असते मलाही नाही माहिती. असो, माझी शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायचे तर साधारण त्या कोविडच्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे 10-15 दिवस क्वारंटाईन राहावे लागते. आता त्यात येत्या 14 (जून) तारखेला माझा वाढदिवस आला आहे. आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने भेटायला येतात. सर्वांना भेटून बरं वाटतं. मिही आपल्या सर्वांना भेटण्याची अतूरतेने वाट पाहतो. पण, या वेळी 14 तारखेला मला कोणाला म्हणजे कोणालाच भेटता येणार नाही. या भेटीतून काही संसर्ग झाल्यास पुन्हा शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाईल. त्यामुळे आता मला कोणताच धोका पत्करायचा नाही. कारण गोष्टी किती पुढे ढकलायच्या यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे या 14 तारखेला मी कोणाला म्हणजे कोणालाच भेटणार नाही. त्यामुळे या वाढदिवसाला कोणीही माझ्या घरी येऊ नये. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी जेव्हा शस्त्रक्रिया पूर्ण होईल, बरं वाटायला लागेल तेव्हा मी स्वत:हून सर्वांना सांगेन. भेटेन''. (हेही वाचा, Sanjay Raut On Raj Thackeray: आमचे राजकारण मिमिक्रीवर अवलंबून नाही असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या टीकेला दिले प्रत्यूत्तर)
ट्विट
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन... pic.twitter.com/Eed0DzRGgg
— Raj Thackeray (@RajThackeray) June 12, 2022
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला होता. तत्पूर्वी ते पुणे दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी अयोध्या दौऱ्याच्या दृष्टीने आढावा घेतला. मात्र, प्रकृतीच्या कारणास्थव त्यांना पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले होते. मुंबईला आल्यावर तात्पुरते वैद्यकीय उपचार घेऊन राज ठाकरे यांनी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंदिरात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर सांगितले. तसेच, पायावरील शस्त्रक्रियेमुळे आपण हा दौरा रद्द करत असल्याचे म्हटले.