नरेंद्र मोदी प्रसिद्धी विनायक! राज ठाकरेंचे कुंचल्यातून फटकार
राज ठाकरे यांची पंतप्रदान मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका (संपादित प्रतिमा)

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'प्रसिद्धी विनायक' अशी संभावना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत ''चलो जीते है'' हा लघुपट राज्यातील शाळाशाळांमधून दाखविण्यात यावा, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांनी हा लघुपट दाखविण्यास नकार दर्शवला होता. या पार्श्वभूमिवर ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून फटकारे मारत एक व्यंगचित्र काढले आहे. तसेच, व्यंगचित्रासोबतच 'स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक' अशा शब्दांत मोदींना टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात मोदींसोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. व्यंगचित्रात राज यांनी गणपतीच्या रुपात अवाढव्य आकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवले आहे. तर, गणपतीचे वाहन उंदीर म्हणून अमित शाह यांना चितारले आहे. या चित्रातील गंमत अशी की, उंदराच्या रुपात दाखवलेले अमित शाह आणि पाठीवर गणपती रुपात असलेले नरेंद्र मोदी यांची भक्त आरती करत आहेत. पण, हे भक्तही नरेंद्र मोदी आणि अमित शाहच दिसत आहेत. आरती करताना भक्तांच्या गर्दीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंहही दिसत आहेत. स्वयंप्रतिमेत अडकलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्वावर राज ठाकरे व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य करु पाहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र काढले आहे.

दुसऱ्या बाजूला गणपती रुपात असलेल्या मोदींना चार हात दाखवण्यात आले आहेत. या चारपैकी एका हातात वृत्तपत्रे, दुसऱ्या हाता वृत्तवाहिनीचा कॅमेरा तर, एका हातात इव्हीएम मशीन आणि दुसऱ्या हातात पैशांच्या नोटांची पुडकी दिसत आहे. या नोटांच्या बंडलावर पक्षनिधी असे शब्द दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पर्यायाने भाजप हे इव्हीएममध्ये फेरफार करतात, तसेच, प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन बातम्या पेरतात, असा विरोधक आरोप करतात. राज ठाकरेंनीही व्यंगचित्राच्या माध्यमातून हाच आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान,''बऱ्याच राज्यांनी नाकारलेला मोदींवरचा एक लघुपट महाराष्ट्रात सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि शाळांना जबरदस्तीने दाखवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.- बातमी'' असा उपहासात्मक मजकूर व्यंगचित्राखाली लिहायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.