त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात 13 मे रोजी उरुसाच्या मिरवणुकी दरम्यान त्रंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम धर्मीय बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आले आणि त्यातून वाद उफाळून आला. हिंदू-मुस्लिम वादाची कधी साधी चर्चाही नसलेल्या त्रंबकेश्वर नगरीत तणावाची स्थिति निर्माण झाली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळाले होते त्यातून आरोप प्रत्यारोपही झाले. याच बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवायचा आहे इतरांनी त्यात लुडबूड करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे सध्या त्यांच्या नाशिकच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एखादी परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. तसंच हा जो काही विषय आहे तो संस्थांनाचा आणि गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लीम एकोप्याने राहतात. माहीमचा दर्गा आहे मकदुमबाबांचा तिथे उरुस असताना जी चादर चढवतात ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवतो. अशी अनेक उदाहारणं देता येतील. असे राज ठाकरे यांनी म्हटले.
त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. इतरांनी त्यात पडू नये, बाहेरच्या लोकांनी पडायची गरज नाही. यामध्ये कुणाला दंगली हव्या आहेत का? चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचा त्याला काही अर्थ नाही. आणखी एक महत्त्वाचं, मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधीच दंगली होत नाहीत. त्यांचं सगळं बालपण, पिढ्या इकडे राहिलेल्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे जे सामंज्यस आहे ते काही लोकांनी बिघडवू नये.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.