MNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना
Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील (Maharashtra) आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारण्यासाठी अनेक पक्ष तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी विविध शहरात आपला दौरा सुरू केला आहे. नाशिक आणि पुणे पाठोपाठ मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ठाण्यातील सीकएपी हॉलमध्ये राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा तसेच सोशल मीडियाचा वापर कमी करा, असा आदेश दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा. ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत. तेवढ्याच वार्ड शाखाध्यक्ष मला पाहिजेत, जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे. तसेच एकमेकांशी जोडून राहा, हेवेदावे करू नका. जे नवीन येतील, जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी येऊ नका. एकमेकांशी वाद न करता नव्याने पक्ष बांधणी करा. पक्ष कसा बळकट होईल? याचा विचार करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा-CM Udhhav Thackarey Birthday: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

महत्वाचे म्हणजे, ठाणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही नगरसेवक नाही. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असे मनसे नेते सांगतात. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार असल्याचे मनसे नेते सांगत आहेत. यामुळे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.