Raj Thackeray on Ashok Saraf: अशोक सराफ (Ashok Saraf) हे दक्षिणेमध्ये असते, तर ते आज मुख्यमंत्री असते, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये 'अशोकपर्व' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे भरभरुन कौतुक केलं. अशोक सराफ हे परदेशात असते तर आणखी मोठे झाले असते. विदेशात कलाकारांच्या नावाने एअरपोर्ट आहेत. आपल्याकडे मात्र फारफार तर चौकांना कलाकारांची नावं दिली जातात. आजच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान असायला हवे होते, कारण अशोक सराफ त्या ताकदीचे कलाकार आहेत. आज मोठी माणसं उरली नाहीत म्हणून आमच्यासारख्या माणसांच्या हस्ते तुमचा सत्कार करावा लागतोय, असा अप्रत्यक्ष टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला.
ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो. त्याने आपण त्यांना आवडतो हे सांगणे फार आनंदायी आहे. आजही अशोक सराफ यांचे नाव घेतल्यानंतर सभागृह तुडुंब भरते. इतकी वर्षे एखादा कलावंत काम करतो. अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री राहिले असते. त्यांच्या 40 - 40 फूट कटावेजवर दुग्धभिषेक झाला असता. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत, अशी खंत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली. (हेही वाचा -Raj Thackeray On PM Modi: हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभत नाही; जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरे यांची भाजपवर जहरी टीका)
अशोक सराफ समोर आले की प्रत्येकाला खळखळून हसवायला लावतात. एखादा विनोद आज चित्रित केला जातो. पण त्यावर लोकं दीड-दोन वर्षांनी हसतात, ही साधी गोष्ट नाही. एखाद्या कलाकाराचं महत्त्व काय असतं ते परराज्यात आणि विदेशात गेल्यावर समजतं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
अशोक सराफ यांचे मूळ घराणे बेळगावचे आणि त्यांचा जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवला असतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी सभागृहात हशा पिकवला. यावेळी मोठ्या संख्येने अशोक सराफ यांचे चाहते उपस्थित होते.