राज ठाकरे (संग्रहित प्रतिमा)

अवनी अर्थातच टी-1 या वाघिणीच्या हत्येवरून राज्य सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि देशभरातील अनेक प्राणीमित्र संघटनांनी राज्य सरकारवर टीका केली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. हा माज उतरवायलाच हवा, असे सांगतानाच वनमंत्री मुनगंटीवार हे काही वनतज्ज्ञ नाहीत. काही दिवसांनी त्यांचं मंत्रीपद जाऊही शकतं. पण, अवनी अर्थातच टी-1 या वाघिणीच्या हत्येवरून ते ज्या पद्धतीने जे उत्तरं देत आहेत, ते योग्य नसल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.

अवनी किंवा टी-1 या वाघिणीच्या हत्येवरुन सुरु असलेल्या वादावर राज ठाकरे यांनी मुंबई येते प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वाघीणीला ठार मारण्याऐवजी तिला बेशुद्धही करता आलं असतं. पण, सरकारने तसं केलं नाही. तसेच, एक वाघीण ठार करुन सरकारने तिच्या दोन बछड्यांनाही अनाथ केलं. आता ते बछडे सपडत नाहीत. म्हणजे, एकाला ठार केलं आणि त्यासोबत इतर दोन जीवांनाही मृत्यूच्या दाढेत आणून ठेवलं, असाच हा प्रकार असल्याचे ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, लक्ष्मीपूजन : मोदी, फडणवीस, गडकरींवर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून टिकास्त्र)

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबई येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये होत असलेल्या अतिक्रमणांकडेही लक्ष वेधले. इथे होणाऱ्या अतिक्रमणांमुळे बिबटे व माणसांमध्ये संघर्ष होत असल्याचे राज यांनी सांगितले. दरम्यान, अंबानींच्या प्रकल्पासाठी सरकारने वाघिणीला मारले काय? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.