राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईचे महापौर; राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे
राज ठाकरे व्यंगचित्र (Photo Credit : Twitter)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईचे महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या निर्णयावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. व्यंगचित्राच्या माध्यामातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंजऱ्यात दाखवण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौरांची निवासाची जागा स्मारक ट्रस्टला देण्यात आली. त्यामुळे महापौरांच्या निवासाची सोय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात आली आहे. या निर्णयामुळेच राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्यंगचित्र पोस्ट करुन शिवसेनेवर निशाणा साधला.

महापौरांना जिजामात उद्यानात घर देण्यात आल्याच्या बातमीचा संदर्भ देत हे व्यंगचित्र साकारले आहे. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात दाखवण्यात आले आहे. तिथे एक महिला आपल्या मुलाला सांगत आहे की, "बाळा, त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत."

मात्र राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही दिवाळीनिमित्त विशेष व्यंगचित्र मालिका राज ठाकरेंनी सुरु केली होती. त्या मालिकेत राज ठाकरे दरदिवशी नवे व्यंगचित्र सादर करत होते. प्रत्येक दिवसाचे महत्त्व साधत राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून अनेक नेत्यांवर टीका केली.