पुणे शहरात पावसाने धोक्याची पातळी ओलांडली; 500 कुटुंबांचे स्थलांतर, मुठा नदीला पूर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Wikimedia Commons)

गेले दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस चालू आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील पूरस्थितीमुळे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशात पुणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 500 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पानशेत आणि खडकवासला धरण पूर्णतः भरले असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

पुणे शहरातील मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील भिडे पूल तर केव्हाच पाण्याखाली गेला आहे. सध्या धरणातून ज्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे ते पाहून शहरातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी 11 वाजता खडकवासला धरणातून तब्बल 35 हजार 574 क्युसेस पाणी सोडण्यात आले. शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडला असून, रविवारी सकाळी देखील पाऊस चालू आहे. त्यामुळे प्रशासनाने पुणेकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा: हवामान विभागाकडून समुद्र भरती काळात सतर्कतेचा इशारा; मुसळधार पावसाचे मुंबईकरांवरील संकट कायम)

शहरातील शिवणे, उत्तमनागर, खिलरेवस्ती, सिंहगड रोड, शिवाजीनगर, जुना बाजार, ढोले-पाटील रोड, औंध, दापोडी, बोपोडी, येरवडा, हडपसर, आणि ओंकारेश्वर मंदिर या भागांना पुराचा जास्त धोका आहे. दरम्यान, महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार आतापर्यंत शहराच्या विविध भागातील एकूण 625 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर या लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने, एकूण 289 कुटुंबातील 1026 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.