Photo Credit- X

Maharashtra Rain Alert: राज्यात मान्सून (Maharashtra Rain)पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत काल मोठा उकाडा नागरिकांनी सहन केल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर आज पहाटेपासून शहर आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. आज शनिवारी मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आला असून उद्या, रविवारी ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील (Marathwada )छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा:Weather Forecast Tomorrow: भारतात कसे असेल उद्याचे हवामान, जाणून घ्या, 24 जुलैचा अंदाज )

पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात शनिवार आणि रविवार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी असे पसरलेले आहे. परिणामी, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.(हेही वाचा:Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह जोरदार पाऊस कोसळणार; IMDने दिला इशारा )

धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये रविवारी तर नाशिक जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळ्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, परिणामी नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची सोमवारपर्यंत शक्यता आहे. दक्षिण कोकणात रायगड जिल्ह्यात शनिवार आणि सोमवारसाठी, रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपर्यंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.