अंबरनाथ रेल्वे स्थानकात कर्तव्यदक्ष कर्मचार्‍याने वेळीच CPR दिल्याने तरूणाचे वाचवले प्राण
प्रतिकात्मक फोटो (Photo credits: Pixabay)

अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये (Ambernath Railway Station) एका तरूणाच्या मदतीला रेल्वे पोलीस दलातील जवान धावून आल्याने जीवनदान मिळाले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, महेश सुर्वे हा तरूण चक्कर येऊन अचानक रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोसळला होता. बेशुद्ध झालेल्या महेशला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण तो काही केल्या शुद्धीत येत नव्हता. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत रेल्वे पोलीस दलातील जवान मोहन दास यांनी तातडीने सीपीआर दिला. मोहन दास यांच्या प्रयत्नांना यश आले आणि काही काळातच तो शुद्धीवर आला. दरम्यान यानंतर त्याच्या कुटुंबियांना बोलावून महेश सुर्वे याला घरी पाठवण्यात आले. नक्की वाचा:  Mumbai Local: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान.

दरम्यान रेल्वे पोलिस जवानाच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचल्याने रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे. महेश वर अंबरनाथ रेल्वे स्थानकातच प्राथमिक उपचार देखील करण्यात आले आहेत. अंबरनाथ स्थानकातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्येहीकैद झाली आहे. टीव्ही 19 च्या रिपोर्ट्स नुसार, अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर 15 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महेश सुर्वे नावाचा 22 वर्षीय तरुण प्लॅटफॉर्मवर असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. नंतर तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला सीपीआर देऊन वाचवण्यात आले.

आज देखील मध्य रेल्वेने काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना शेअर केली आहे. त्यामध्ये गरोदर महिलेचा ट्रेन मधून उतरताना पाय सरकल्याने रेल्वे रूळाखाली जाण्यापासून एका आरपीएफ जवानाने तिला वाचवल्याचं फूटेज शेअर करण्यात आलं आहे.