Railway (Photo credits: PTI)

Harbour Local Delay :  लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. अनेकांचं दिवसाचं गणित त्यानुसारच बांधलेलं असतं. आज हार्बर लाईनवर मुंबई लोकलला होणारा एक मोठा अपघात सजग व्यक्तीमुळे टळला आहे. कुर्ला टिळकनगरदरम्यान (Kurla - TilakNagar)  रेल्वे रूळाला तडे गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मात्र ती पूर्ववत करण्यासाठी रेल्वेप्रशासन प्रयत्न करत आहे.

मुकेश कुमार (Mukesh Kumar) असं नाव असलेल्या रेल्वेच्या कीमॅनने रेल्वेच्या रूळाला तडे गेल्याचं पाहिलं. वेळीच प्रसंगावधान राखून त्याने सीएसएमटीकडे रवाना होणारी पनवेल गाडी थांबवण्याचे इशारे मोटारमॅनला केले. मुकेशच्या प्रसंगावधांतेमुळे हजारो प्रवाशांचा आज जीव वाचला आहे. अन्यथा तडे गेलेल्या रूळावरून गाडी धावली असल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. रेल्वेनेदेखील मुकेशच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

मुंबईमध्ये सलग सातव्या दिवशी बेस्टचा संप सुरू असल्याने प्रवाशांची रेल्वे, मेट्रो, रिक्षा, टॅक्सी अशा पर्यायी सेवेकडे कल वाढला आहे. ऐन गर्दीच्या आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेसेवादेखील खोळंबल्याने मुंबईच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. हार्बर लाईन सध्या उशिराने धावत आहे.