
महाराष्ट्राच्या रायगड (Raigad) जिल्ह्यात समुद्रकिनार्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी आठ मृतदेह सापडले आहेत. पोलिसांना संशय आहे की हे बार्ज पी-305 (Barge P305) च्या पीडितांचे मृतदेह असावेत, जे तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईजवळ बुडाले होते. रायगड पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, शनिवारी सापडलेल्या आठ मृतदेहांपैकी 5 मृतदेह मांडवा किनारपट्टीवर आले आहेत आणि दोन अलिबाग व एक मुरुड येथे सापडले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मृतदेहांविषयी माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, बार्ज पी-305 हे तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्राच्या लाटांमुळे सोमवारी बुडाले होते आणि नंतर शनिवारी ते समुद्र पातळीवर दिसून आले. शनिवारी आणखी 6 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 66 झाली आहे. तर 9 कर्मचारी अजून बेपत्ता आहेत. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, घटनेच्या वेळी बार्ज पी-305 वर 261 जवान होते, त्यापैकी आतापर्यंत 186 जणांची सुटका करण्यात आली आहे.
बार्ज पी-305 वर ओएनजीसी सरकारी तेल व गॅस कंपनीच्या ऑफशोअर ऑइल ड्रिलिंग प्लॅटफॉर्मची देखभाल करणारे हे कर्मचारी होते. गुजरातकडे जाणारे हे जहाज, मुंबई समुद्र किनाऱ्याजवळ 3 नांगर टाकुन उभे होते. मात्र सोमवारी सायंकाळी तुफान वारे आणि उंच लाटांमुळे ते हेलखावे खाऊ लागले व बुडाले.
दुसरीकडे, गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात शनिवारी अरबी समुद्राच्या काठावर चार मृतदेह सापडले आहे. यावेळी, वलसाडचे पोलिस अधीक्षक राजदीपसिंग झाला यांनी सांगितले की, मृतदेहावरील गणवेश आणि लाइफ जॅकेट पाहिल्यानंतर असे दिसते आहे की ते सर्व मुंबई किनाऱ्याजवळ बुडलेल्या बार्ज पी-305 चे कर्मचारी असावेत.