Rahul Gandhi Stickers At Pm Modis Yavatmal Rally: सभा नरेंद्र मोदी यांची आणि चर्चा राहुल गांधी यांच्या नावाची; असं का घडलं? घ्या जाणून
Rahul Gandhi And Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Narendra Modi Yavatmal Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा (PM Narendra Modi Yavatmal Rally) आणि चर्चा वेगळ्या नावाची, असे शक्यतो कधीच घडत नाही. मोदी ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे केवळ 'मोदी..मोदी..' हाच गजर असतो. पण, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांच्या यवतमाळ येथील सभेचे ठिकाण याला अपवाद ठरले आहे. या ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. या चर्चेला कारण ठरल्या आहेत सभास्थळावरील खुर्च्या. कदाचित वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 'खुर्च्या चर्चेचे कारण कसे असू शकेल'. तुम्ही करत असलेल्या विचार तुमच्यापुरता खरा असू शकतो. पण, एकूण प्रकरण लक्षात आल्यावर तुम्हालाही त्याचे कारण समजू शकेल. घ्या जाणून 'सभा नरेंद्र मोदी यांची आणि चर्चा राहुल गांधी यांच्या नावाची' असे का बोलले जात आहे.

नेमके काय घडले?

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी जवळपास 47 एकर परिसरात 9 लाख 10 हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात सुमारे दोन लाखांहून अधिक खुर्च्या आहेत. सभास्थळी लोकही जमू लागले आहेत. दरम्यान, या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या अनेक खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टीकर्स (Rahul Gandhi Stickers) असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेसला निधी द्या (स्कँन टू डोनेट), असे अवाहन करणारा संदेश. सोबतच क्यूआर कोडसुद्धा. त्यामुळे 'सभा नरेंद्र मोदी यांची आणि चर्चा राहुल गांधी यांच्या नावाची' असा काहीसा प्रकार येथे दिसतो आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Yavatmal Visit Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचतगटातील महिलांना करणार मार्गदर्शन)

प्रसारमाध्यमातून चर्चा होताच आयोजक लागले कामाला

प्रसारमाध्यमांतून या खुर्च्या, राहुल गांधी यांचे स्टीकर्स आणि सभास्थळ यांबाबत बातम्या येताच आयोजकांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. सभास्थळावर असलेल्या खुर्च्यांवरील स्टीकर्स काढण्यासाठी तातडीने कारवाई सुरु झाली. लोक कामाला लागले आणि हे स्टिकर्स हटविण्यात आले. (हेही वाचा, PM Modi On Rahul Gandhi: 'ज्यांचे स्वत:चेचं भान ठिकाणावर नाही ते यूपी आणि काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत'; राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचा पलटवार)

कंत्राटदाराच्या दूर्लक्षातून नकळत घडली चूक?

अलिकडेच काँग्रेसचे एक राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनासाठी काँग्रेसनेही आसनव्यवस्था खुर्च्यांवर केली होती. या वेळी काँग्रेसने पक्षनिधीसाठी कार्यकर्ता आणि जनतेला अवाहन केले होते. लोकांना पक्षनिधी देणे सोपे जावे यासाठी आसनव्यवस्थेसाठी दिलेल्या खुर्च्यांच्या पाठीमागे स्टीकर्स लावण्यात आले होते. त्यातीलच काही खुर्च्या नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी आणल्या गेल्या असाव्यात. ज्या कंत्राटदाराच्या खुर्च्या आहेत त कंत्राटदार या खुर्च्यांवरील स्टीकर्स काढणे विसरुन गेला असेल. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला असावा, अशी चर्चा आहे. मात्र, या छोट्याशा चुकीची चर्चा मात्र राज्यभर होऊ लागली आहे.